31 ऑक्टोबरअखेर 12000 पाक युद्धकैदी परत पाठविणार
नवी दिल्ली, ता. 5 – येत्या 10 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत 12000 पाक युद्धकैदी पाकिस्तानला परत पाठविले जातील. आग्रा, मीरत, रूरकी येथील युद्धकैद्यांच्या छावण्यांतून हे युद्धकैदी पाठविले जातील, असे पाक रेडिओने जाहीर केले आहे.
त्यांना घेऊन येणाऱ्या रेल्वेगाड्या 10, 12, 14, 16 व 18 या दिवशी वाघा सरहद्दीवर येतील. प्रत्येक गाडीत 400 युद्धकैदी असतील. रेडिओनुसार, या महिनाअखेर 25000 बंगाली नागरिक पाकिस्तानमधून बांगला देशाकडे परत पाठविले जातील.
साखर उत्पादनात साडेसात लाख टनांची वाढ
नवी दिल्ली – गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी साखरेच्या उत्पादनात साडेसात लाख टन वाढ झाली आहे. मागील वर्षी 10 कारखाने होते, या वर्षी 13 कारखान्यांमुळे उत्पादन वाढले.
कायदेशीर रेशनिंग जारी करा
पुणे – शासनाने अन्नधान्याचा व जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा पुरवठा करावा व कायदेशीर रेशनिंग जारी करावे असा शासनाकडे विनंती करणारा ठराव महापालिका सभेने आजच्या खास सभेद्वारा पास केला. या मागणीसाठी स्थायी समितीच्या पाच सदस्यांनी खास सभेची मागणी केली होती.
तिसरे वेतनमंडळ ः पुढील आठवड्यात निर्णय
नवी दिल्ली – तिसऱ्या वेतन मंडळाच्या शिफारशीवर शासनातर्फे पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री नामदार यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त सल्लागार समितीला आज वरील आश्वासन दिल्याचे समजते.
20 किलोपर्यंत आज गोडेतेल खरेदी करा
पुणे – उद्यापासून नियंत्रित भावाने गोडेतेल विक्रीची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक ग्राहकास 20 किलोपर्यंत तेल मिळू शकेल. सध्याचा भाव 8.60 असा आहे.