जिल्ह्यात करोना रुग्णांमध्ये वाढ; शिर्डीकरांची धाकधूक वाढली
बाळासाहेब सोनवणे
शिर्डी – गेल्या तीन महिन्यांपासून अहमदनगर जिल्हा करोनाच्या विळख्यातून बाहेर पडताना दिसत नसल्यामुळे सातत्यपूर्ण जिल्ह्यात करोनाच्या ऍक्टिव्ह केसेस सातत्यपूर्ण राहत असून देशविदेशातील भाविकांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, शिर्डीच्या साईबाबांचे मंदिर उघडणार या राज्याच्या निर्णयाने भाविक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण झालेले असताना आता पुन्हा करोनाचे काळे ढग भाविकांच्या या आनंदावर दाटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाविक व नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
नुकतेच राज्य शासनाने तिसऱ्या लाटेचा आढावा घेत, दि. 7 रोजी राज्यातील मंदिरे उघडण्याची घोषणा केली आणि शिर्डीसह साईभक्तांमध्ये हर्षोउल्हास निर्माण झाला. नगर जिल्ह्यातील करोना रुग्णांची संख्या गेल्या दोन महिन्यांपासून सातत्यपूर्ण तितकीच राहत असून ही बाधा मंदिर उघडण्यासाठी बाधा निर्माण करू शकते.
तर, दुसरीकडे जिल्ह्यातील 61 गाव ही कंटोन्मेट क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. त्यातच शिर्डी शहरालगत असलेले राहाता नगरपालिकेन व्यावसायिकांच्या वेळेला मर्यादा आणल्या आहेत. राहाता शहर जवळच असल्याने या मर्यादा शिर्डी शहरावर येऊ शकतात. त्यातच तालुक्यातील उत्तर भागासाठी साई संस्थानचे रुग्णालय कोविड रुग्णांवर उपचार करीत आहे. त्यामुळे भाविक व नागरिकांची चिंता वाढली आहे.
साई मंदिर उघडण्यासाठी संस्थान प्रशासन व जिल्हा प्रशासनाने नुकतीच एक आढाव बैठक घेतली. त्या बैठकीत येणाऱ्या भाविकांची विमानतळ, रेल्वे, बस स्थानकांवर चाचण्या करण्यात येणार आहे. शिर्डीसह परिसरातील नागरिकांच्या लसीकरण करण्यावर भर देण्याचा विचार करण्यात आला. त्यानुसार शिर्डी नगरपंचायतीने महालसीकरणाची मोहीम ही राबवली आहे.
दुसऱ्या बाजूला जिल्हा प्रशासनाने सक्तीचा पवित्रा घेत करोनाचे नियम न पाळण्यावर कायदाच्या बडगा उगारला आहे. स्तब्ध झालेली शासकीय यंत्रणा पुन्हा कार्यान्वित होऊ लागल्या आहेत.
त्यामुळे एकीकडे राज्यकर्त्यांनी मंदिरे उघडण्याची घोषणा केली. दुसरीकडे प्रशासन करोनाच्या नियमावलीची कठोर पालनासाठी वज्र मूठ आवळली आहे. त्यामुळे असंख्य भाविक आणि स्थानिकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. मात्र मंदिर उघडे व्हावे, भाविकांचा मोठा अट्टाहास आहे. कोरोनाचे ढग निष्प्रभ झाले तर साई दर्शन देतील अशी भाबडी आशा देखील आहे.
राज्य शासनाच्या आदेशानव्ये साईबाबा संस्थान मंदिर उघडणार आहे. त्या दृष्टीने मंदिर प्रशासनाची पूर्व तयारी झालेली आहे. भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. त्याच दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही करोना-19 चे नियमावलीचे तंतोतंत पालन करून भाविकांना दर्शन देणार आहोत.
भाग्यश्री बाणाईत, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान, शिर्डी