दोन्ही कोरियांचे एकीकरण
यूनो कचेरी, दि. 21 – उत्तर कोरिया व दक्षिण कोरिया ही दोन्ही सरकारे कोरियाचे एकीकरणासाठी प्रत्यक्ष बोलणी सुरू ठेवलीत असे दोन्ही सरकारांनी जाहीर केले आहे. अमेरिका गटांतील राष्ट्रांनी दक्षिण कोरियाला राष्ट्रसंघात स्वतंत्र सभासदत्व द्यावे असा आग्रह धरला आहे, तर रशियन गटांतील राष्ट्रांनी उत्तर कोरियाला एकट्यालाच संबंध कोरियाचे सभासदत्व मिळावे, असे प्रतिपादन केले.
शरीरातील हालचालींचे चलतचित्रीकरण यंत्र
नवी दिल्ली – शरीरांतर्गत अवयवांचे रंगीत चलतचित्रीकरण करणारे एक नवीन एक्स-रे यंत्र इस्रायली संस्थेने तयार केले आहे. ही चित्रे नंतर टेलिव्हिजनवर दाखविणे शक्य होणार आहे.
एव्हरेस्ट जिंकण्यासाठी आता स्पेन पुढे आला
काठमांडू – पुढील वर्षीच्या उन्हाळ्यात स्पेन प्रथमच एव्हरेस्टवर चढाई करणार आहे. स्पेन जर या कामी यशस्वी झाला तर तो 8 वा विजयी देश ठरेल.
पुण्यातील पंपवाले आहे तेवढे पेट्रोल विकून स्वस्थ बसणार!
पुणे – आज मध्यरात्रीपासून पेट्रोल-डिझेलची खरेदी करावयाची नाही व असलेला साठा संपला की, विक्री करावयाची नाही, असा निर्णय पुणे पेट्रोल वितरक संघटनेने घेतला. पुण्याच्या 100 पेट्रोल पंपावर तीन दिवस पुरेल एवढा साठा असून वाढलेल्या मागणीमुळे व “विक्री बंद’मुळे हा साठा दोन दिवसातच संपेल, असा अंदाज आहे. यानंतर पंप बेमुदत बंद राहतील.
इंडियन एअर लाइन्सची परिस्थिती कठीण
नवी दिल्ली – इंडियन एअर लाइन्सची परिस्थिती अत्यंत कठीण झाली आहे. कारण आज 15 उड्डाणे रद्द करण्यात आली. कंपनीचे कामगारांना नवी पद्धत पसंत नाही म्हणून त्यांनी चळवळ सुरू केली आहे. आज चळवळीचा 10वा दिवस आहे. विमाने उपलब्ध नसल्यामुळे आणखीही उड्डाणे रद्द करावी लागतील, असे समजते.