नवी दिल्ली – पुढील तीन दिवसांत राज्य व केंद्रशासित प्रदेशांना एकूण 48 लाख लसींचे डोस देण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशातील विविध राज्यांकडे अजून पूर्वीचे 1 कोटी 80 लाख डोस शिल्लक आहेत, अशी माहितीही या मंत्रालयाने दिली आहे.
आतापर्यंत केंद्र सरकारने करोना लसींचे सुमारे 20 कोटींहून अधिक डोस राज्यांना पुरवले आहेत. या खेरीज राज्यांना लसींची थेट खरेदी करण्याचीही अनुमती दिली आहे. पण त्याच्यावरही केंद्राचेच नियंत्रण असल्याचे व आम्ही नोंदवलेल्या प्रमाणात आम्हाला लसी मिळत नसल्याची अनेक राज्यांची तक्रार आहे.
अनेक राज्यांनी ग्लोबल टेंडर काढून लसी मागवण्याचा निर्णय घेतला असला तरी राज्यांना थेट लस विक्री करण्यास विदेशी लस उत्पादकांनी नकार दिला आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लसीकरणाची जय्यत तयारी करूनसुद्धा त्यांना त्या प्रमाणात अजूनही लस उपलब्ध होत नाही अशी तक्रार आहे.