पुणे : शहरात पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहणार असून, अति हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. तर काही भगात मेघगर्जनेसह पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे शहरातील किमान तापमानात वाढ झाली असून, गुरूवारी (दि. 4) किमान तापमान 15.9 अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
यंदा थंडीचा कडाडा कमी असून, धुके आणि ढगाळ वातावरणामुळे शहरातील हवामान वारंवार बदल आहे. त्याचा परिणाम थंडीवर होत आहे. डिसेंबरच्या अखेरीस 10 अंशाच्या खाली पोहचलेल्या थंडीचा पारा नवीन वर्षात चार ते पाच अंशाने वाढला. त्यामुळे दिवसा वाजणारी थंडी गायब झाली असून, रात्रीची हुडहुडी भरणारी थंडीही कमी झाल्याचा अनुभव मागील दोन दिवसांपासून आला आहे.
शहरात दि. 5 ते 7 जानेवारी दरम्यान, सकाळी धुके तर दिवसभर आकाश ढगाळ राहणार आहे. त्यामुळे वाढलेले किमान तापमानात एक ते दोन अंशाने घट होईल. मात्र, या तीन दिवसात शहराच्या काही भागात अति हलका तर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
राज्यातही पावसाची शक्यता…
हवामानातील बदलामुळे राज्याच्या कोकण-गोव्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस हलका पाऊस पडेल. तर 7 ते 8 जानेवारीपर्यंत सोलापूर, बीड, संभाजीनगर, अकोला, अमरावती, बुलढाणा यासह अन्य काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दि. 9 जानेवारीनंतर राज्यातील हवामानात बदल झाल्यामुळे किमान व कमाल तापमानात घट होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.