शिक्षण विभागाचे प्रयत्न ः शिक्षण संचालक पाटील यांची माहिती
तंत्रस्नेही पॅनलद्वारानिर्मित शारीरिक शिक्षण इ-कंटेंटचा शुभारंभ
पुणे – “करोनाच्या पार्श्वभूमीवर शारीरिक शिक्षणातील तंत्रशुद्ध व्यायाम प्रकाराची माहिती विद्यार्थ्यांसमवेत शिक्षक, पालक व समाजासाठी महत्त्वाची व रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनलने तयार केलेले इ-कंटेंट हे दीक्षा ऍप व जिओ टीव्ही चॅनलवर घेण्यात येऊन सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे,’ असे माध्यमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी सांगितले.
राज्य क्रीडा शिक्षक महासंघ व महाराष्ट्र शारीरिक शिक्षण तंत्रस्नेही पॅनलद्वारानिर्मित शारीरिक शिक्षण इ-कंटेंटचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते झाला.
तर, शारीरिक शिक्षण आणि खेळ यांची सांगड घालून सुदृढ व निरोगी समाज निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमातून प्रशासन कार्यरत असल्याचे मत क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया व्यक्त केले.
देशाचा आधारस्तंभ असलेला विद्यार्थी सुदृढ झाला, तर करोनासारख्या महामारीला तो पळवून लावेल, असे मत सहायक संचालक सुहास पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर यांनी 220 शारीरिक शिक्षकांना एकत्रित करून सात दिवसांचे प्रशिक्षण ऑनलाइनद्वारे दिल्याची माहिती दिली. यावेळी बोलताना तंत्रस्नेही पॅनलच्या सदस्या सुवर्णा देवळाणकर यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यामातून शारीरिक शिक्षणाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे नमूद केले. प्रास्ताविक आनंद पवार यांनी, तर सूत्रसंचालन राजेश जाधव यांनी केले.