पुणे – पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील लोणावळा ते खोपोली एक्झिट या भागातील पर्यायी रस्ताच्या दोन बोगदे व दोन व्हाया डक्टसह आठ पदरी नवीन रस्ता बांधला जात आहे. यातील एक बोगद्याचे 9 पैकी 4 किलोमीटर इतके खोदकाम पूर्ण झाले आहे. या बोगद्याची रुंदी 23.5 मीटर इतकी आहे. या मिसिंग लिंकमुळे पुणे-मुंबई हे अंतर सहा कि.मी ने कमी होणार असून 25 मिनिटांचा वेळ वाचणार आहे.
कामास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) सुरुवात केली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र मिळतात व पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात.
आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट ही रुंदी सहा पदरी असून या भागात 10 पदरी वाहतूक येऊन मिळते. या भागात घाट व चढ उताराचे प्रमाण जास्त असून दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यात बंद ठेवावी लागते.
या पार्श्वभूमीवर द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 कि.मी च्या राहिलेल्या मिसींग लिंकमुळे मुंबईला लवकर पोहचणे शक्य होणार आहे.