इजिप्त-इस्रायल युद्ध होणार नाही
वॉशिंग्टन, दि. 30 – इजिप्त व इस्रायल यांच्यातील वाटाघाटीत जरी सध्या अडचणी निर्माण होत असल्या, तरी त्यामुळे दोन देशांत नवे युद्ध होण्याचा संभव नाही, असे उद्गार इस्रायलचे पंतप्रधान बेगिन यांनी एका मुलाखतीत काढले आहेत. बेगिन यांनी म्हटले आहे, ‘आता युद्ध नाही, रक्तपात नाही, असे वचन मला अध्यक्ष सादत यांनी दिलेले आहे. मीही त्यांना तसा प्रतिसाद दिला आहे.’
इंग्रजी हटाव ही घोषणा अत्यंत हानिकारक ठरेल
मुंबई – इंग्रजी ही ज्ञानभाषा आहे. विद्यार्थ्यांना या पुढील काळात जगाच्या ज्ञानात भागीदार व्हायचे आहे. त्यांना पाश्चात्य राष्ट्रातील विद्यार्थ्यांबरोबर स्पर्धा करायची आहे. यामुळे इंग्रजी हटाव ही घोषणा अत्यंत हानिकारक ठरणार आहे. पूर्वी संस्कृत ही ज्ञानभाषा होती, या भाषेपासून सामान्य माणसाला आपण दूर ठेवले. आता इंग्रजी ज्ञानभाषा आहे. आता सामान्य माणसाला या भाषेपासून आपण दूर ठेवू पाहतो आहोत. याचा अनिष्ट परिणाम संपूर्ण देशावर होईल, असे उद्गार आमदार डॉ. मा. प. मंगुडकर यांनी काढले.