केंद्र व राज्ये यांची मिळून एकच राष्ट्रीय साधनसंपत्ती
नवी दिल्ली, दि. 19 – केंद्रीय अर्थमंत्री एच. एम. पटेल यांनी असे सांगितले की, केंद्र व राज्य सरकारे यांची संपत्ती मिळविण्याची साधने ही राष्ट्रीय स्वरूपाची समजण्यात यावीत व त्यांची वाटणी केंद्रे व राज्ये यांचे दरम्यान गरजेप्रमाणे करावीत. राज्यांची साधनसंपत्ती ही त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीच्या मानाने तोकडी पडते. म्हणून केंद्राकडील साधनसंपत्ती राज्याकडे कशी वळवावी यासंबंधी घटनेत तरतूद करून ठेवली आहे. घटनेतील तरतुदीत जर फेरफार केले तर राज्यांचेच नुकसान होईल. मागास राज्यांचे तर फार नुकसान होईल.
केंद्र व राज्ये यांचे आर्थिक संबंध
नवी दिल्ली – केंद्र सरकार व राज्य सरकारे यांचे आर्थिक संबंध कसे असावेत या विषयावर एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात चंदीगड येथे राज्यांचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांची परिषद भरणार आहे.
काश्मीरविषयी पाकची भूमिका कायम
नवी दिल्ली- राष्ट्रसंघाने काश्मीर प्रश्नाविषयी घेतलेली भूमिका कायम आहे, असे पाकचे परराष्ट्र सल्लागार आगाशाही म्हणाले. दोन देशांतील काश्मीरचे वादग्रस्त प्रश्नसुद्धा उभयपक्षी वाटाघाटी करून सोडवावेत, असे सिमला करारात नमूद केले आहे.