अंदमान बेटात खनिजांचा शोध
नवी दिल्ली, दि. 19 – अंदमान व निकोबार बेटांच्या समूहामध्ये खनिज साठे शोधण्याचे काम भारताच्या भूगर्भ पाहणी मंडळाकडून चालू असल्याचे केंद्रीय पोलाद व खाण मंत्री बिजू पटनाइक यांनी सांगितले. प्लॅटिनम कोबाल्ट, क्रोमिअम इत्यादीसाठी अल्टॉमफिक खडकांची पहाणी केली जात आहे. तांब्याचे साठे शोधण्यासाठी पहाणी चालू आहे. खनिज मिळू शकणार्या संभाव्य जागांचा शोध घेण्याचे काम अजून प्राथमिक अवस्थेत असून पाहणी पूर्ण झाल्यावर खोदाईचे काम हाती घेतले जाईल.
साधे निवासस्थान मिळावे
नवी दिल्ली – राष्ट्रपती भवन सोडण्याची आपली इच्छा राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली असून आपणास साधे परंतु सोयीचे निवासस्थान मिळावे असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. या विनंतीकडे गृहबांधणी मंत्रालय त्वरेने लक्ष घालीत आहे.
महंमद अलीस बांगलादेशचे सन्माननीय नागरिकत्व
डाक्का – हेविवेट गटातील जागतिक कीर्तिचा मुष्टीयोद्धा महंमद अली याने बांगलादेशाचे सन्माननीय नागरिकत्व स्वीकारले आहे. बांगलादेशचे अध्यक्ष झियाऊर रहमान यांनी एका साध्या समारंभात हे नागरिकत्व बहाल केले.