श्रीलंकेमध्ये अध्यक्षीय राज्यपद्धतीस सुरुवात
कोलंबो, दि. 4 – श्रीलंकेत आजपासून अध्यक्षीय राज्यपद्धत सुरू झाली. फ्रेंच अध्यक्षीय पद्धतीशी ती जवळची आहे. पंतप्रधान जे. आर. जयवर्धने यांनी अध्यक्षपदाची सूत्रे आज हाती घेतली. आजच्या समारंभाच्या निमित्त कैद्यांना शिक्षेत सूट देण्यात आली. या समारंभास भारतासह अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थिती होते. 10 जनांची मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली. शहरात सर्वत्र रोषणाई केली होती. सकाळी प्रमुख विहारांतून, देवळांतून, चर्चमधून व मशिदीतून प्रार्थना म्हणण्यात आल्या.
भारताशी निकटचे संबंध ठेवण्यास चीन उत्सुक
काठमांडू – भारताबरोबर निकटचे संबंध प्रस्थापित करण्यासाठी चीन उत्सुक आहे, असे चीनचे उपपंतप्रधान तेंग सिआओ पिंग म्हणाले. नेपाळचे पंतप्रधान कीर्ति निधी यांच्याबरोबर चर्चेची दुसरी व शेवटची फेरी संपविल्यानंतर तेंग म्हणाले, भारत चीन या दोन देशांच्या दरम्यानच्या संबंधाबाबत भारतीय नेत्यांनी व्यक्त केलेल्या मतांची आम्ही नोंद घेतली आहे. चीन आपल्या बाजूने संबंध सुरळीत करण्यासाठी उत्सुक आहे, असे सांगून तेंग म्हणाले, तथापि उभय देशांचा विचार करता दोन्ही बाजूंकडून प्रयत्न व्हायला पाहिजे.