चीनशी संबंध सुरळीत करण्याची रशियाची इच्छा
मॉस्को, दि. 2 – चीनशी संबंध सुरळीत करण्याची आपली इच्छा असल्याचे रशियातर्फे जाहीर करण्यात आले. चीनच्या 27व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त क्रेमलिनमधून पाठविलेल्या अभिनंदनपर संदेशात चीनला हे कळविण्यात आले.
हिंदी महासागरात रशिया लष्करीतळ उभारणार नाही
नवी दिल्ली- निःशस्त्रीकरण प्रश्नासंबंधी रशियाने म्हटले की, हिंदी महासागरात रशियाचा लष्करी तळ नाही व असा लष्करी तळ उभारण्याची इच्छाही नाही. परकीय लष्करी तळांचा प्रश्न सोडविला जावा या अटीवर इतर शक्तींबरोबर रशिया हिंदी महासागरातील परकीय देशांच्या लष्करी हालचाली कमी करण्याची मागणी करील.
रविवार पेठेतील “ती’ शाळा चालू राहणार
पुणे – रविवार पेठेतील भांडारकर प्राथमिक बालक मंदिर ही खासगी शाळा विद्यार्थी-पालक व शिक्षकांची गैरसोय होऊ नये म्हणून या शालेय वर्षअखेरपर्यंत चालविण्याचा निर्णय शाळा चालकांनी घेतला आहे. दैनिक प्रभातने ही शाळा बंद होणार अशी बातमी आज प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आज संस्था चालकांनी तातडीने या निर्णयाचा फेरविचार करून वरील निर्णय घेतला.
मोगल लाइन्सची जहाजवाहतूक सुरू
मुंबई- कोकण किनाऱ्यावरील मोगल लाइन्सची जहाजवाहतूक पावसाळ्यात बंद होती ती आज सुरू झाली. जयगड, मुसाकाझी, जैतापूर, विजयदुर्ग, देवगड व पणजी ही बंदरे रोज घेण्यात येतील.