पाचवी योजना वर्षभर आधीच संपुष्टात?
नवी दिल्ली, दि. 10 – पाचवी पंचवार्षिक योजना ठरलेल्या मुदतीपूर्वी 1 वर्ष अगोदर म्हणजेच 31 मार्च 1978 रोजीच संपेल. हा निर्णय नियोजन मंडळाच्या बैठकीत घेतला. पंतप्रधान मोरारजी देसाई या बैठकीचे अध्यक्ष होते. एप्रिल 78 पासून 6 वर्षांची फिरती योजना सुरू करण्याचे मंडळाने ठरविले आहे. नूतन सरकारच्या शेती, पाटबंधारे व लघु व ग्रामोद्योगांना प्रोत्साहन देण्याच्या धोरणांनुसार हा निर्णय घेण्यात आला.
संपूर्ण देशी बनावटीची मिनी कार
नवी दिल्ली – बंगलोरमधील एका फर्मने बनविलेली संपूर्ण देशी बनावटीची “मिनी कार’ देशभर विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे. या मोटारीची किंमत अबकारी करासह 15 हजार रुपये पडेल. या गाडीत 4 माणसांना बसण्याची व्यवस्था आहे. प्रवासाचा खर्च प्रवाशामागे प्रत्येक किमीला 10 पैसे पडेल. जास्तीत जास्त वेग 75 किमी प्रति तास असेल. ही मोटार 4 लिटर पेट्रोलमध्ये 100 किमी जाईल.