उत्तर प्रदेशात बेकायदेशीर ध्वनीक्षेपकांविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यभरात बेकायदेशीर लाऊडस्पीकरवर वेगवान कारवाई करण्यात येत आहे. शनिवारपर्यंत यूपीमधील विविध धार्मिक स्थळांवरून 45 हजारांहून अधिक लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकर विरोधात भूमिका घेतली होती. त्यानंतर महाराष्ट्रासह इतर राज्यात लाऊडस्पीकर वाद सुरु झाला आहे.
यूपीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी सांगितले की, आतापर्यंत धार्मिक स्थळांवरून 45 हजार 773 लाऊडस्पीकर हटवण्यात आले आहेत. त्याच वेळी, 58 हजार 861 लाऊडस्पीकरचा आवाज कमी करण्यात आला आहे. यापैकी जे लाऊडस्पीकर आवाजाच्या मर्यादापेक्षा जास्त असल्याचे आढळून आले, असे लाऊडस्पीकर काढून टाकण्यात आले आहेत.
कोणताही भेदभाव न करता सर्व धार्मिक स्थळांवरून लाऊडस्पीकर काढले जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. यापूर्वी गुरुवारपर्यंत एकूण 21 हजार 963 लाऊडस्पीकर काढण्यात आले असून 42 हजार 332 लाऊडस्पीकरच्या आवाजाची मर्यादा कमी करण्यात आला आहे. यूपीमध्ये जे लाऊडस्पीकर काढले जात आहेत ते सर्व अनधिकृत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
प्रत्येकाला आपापल्या धार्मिक श्रद्धेनुसार पूजा-अर्चा करण्याचे स्वातंत्र्य आहे, असे मुख्यमंत्री योगी म्हणाले होते. परंतु लाऊडस्पीकरचा आवाज परिसराबाहेर जाऊ नये जेणेकरून इतर लोकांना कोणतीही अडचण येऊ नये. या निर्णयानंतरच राज्यात बेकायदा लाऊडस्पीकरवर कारवाई सुरू आहे. दरम्यान, राज्याच्या गृहविभागाने 30 एप्रिल रोजी बेकायदेशीरपणे लावलेले लाऊडस्पीकर काढण्यासाठी केलेल्या कारवाईचा स्टेटस रिपोर्ट मागवला आहे.