15 दिवसांनंतर पाडण्यात प्रशासनाला आले यश
खडकी बाजार येथील पिण्याची टाकी झाली होती धोकादायक
खडकी – खडकी बाजार येथील पिण्याच्या पाण्यासाठीची टाकी सोमवारी पाडण्यात आली. दरम्यान, शुक्रवार आणि शनिवारी 4 मशीनच्या साहाय्याने पाडण्याचा प्रयत्न करूनही यश येत नव्हते. खडकी कॅन्टोन्मेंन्ट बोर्डाने ही टाकी पाडण्यासाठी 43 लाख 50 हजारांची निविदा काढली होती.
गुजरातच्या हर्षा कॉर्पोरेशन या ठेकेदाराला याचे कंत्राट देण्यात आले होते. मागील 15 दिवसांपासून हे काम सुरू होते. टाकीच्या 12 पिलरपैकी सहा पिलर कमकूवत करून शुक्रवारी ही टाकी पाडण्यात येणार होती. मात्र, टाकीचे जुने आणि हीचे काम मजबूत असल्याने एका पोकलेनने हे काम पूर्ण होऊ शकले नाही. शुक्रवारी रात्री मोठी मशीन आणून तिच्या साहाय्याने टाकी पाडण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. यावेळी या टाकीचे तीन पिलर अर्धे पाडून दोन पोकलेनच्या साहाय्याने टाकी पाडण्याचे प्रयत्न शनिवारी करण्यात आले. मात्र, टाकीचे पिलर मजबूत असल्याने टाकी पाडण्यात ठेकेदाराच्या कामगारांना अपयश आले. त्यानंतर शनिवारी दोन पोकलेन आणि दोन क्रेनच्या साहाय्याने टाकीचे पिलर ओढून टाकी पाडण्याचे प्रयत्न पुन्हा करण्यात आले.
मात्र, दोनवेळा प्रयत्न करून त्यात अपयश आल्याने काम थांबविण्यात आले. सोमवारी टाकीजवळच्या टपऱ्या काढून पोकलेन जाण्यासाठी रस्ता करण्यात आला. त्यानंतर टाकीचे दोन पिलर पाडण्यात येवून टाकी जमीनदोस्त करण्यात यश आले. जवळपास 40 वर्षांपूर्वीची ही टाकी खडकीकरांसाठी बांधण्यात आली होती.
या टाकीद्वारे खडकीकरांची तहान भगविली जात होती. टाकीची वेळच्यावेळी दुरुस्ती न झाल्याने जीर्ण झाली होती. काही ठिकाणचे टाकीचे प्लॅस्टरही पडले होते. चार ते पाच वर्षांपूर्वी टाकीच्या पिलरला सिमेंटचा कोट देऊन मजबुती देण्यात आली होती. मात्र, असे असूनही टाकीचे गळतीचे प्रमाण जास्त असल्याने सुरक्षेच्या कारणावरून टाकी पूर्ण क्षमतेने भरलीही जात नव्हती. त्यामुळे खडकीकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. दोन वर्षांपूर्वी नवीन टाकी बांधल्यानंतर ही टाकी वापरात नव्हती. महापालिकेकडून धोकादायक टाकी पाडण्याचे पत्र खडकी कॅन्टोन्मेंन्ट बोर्डास वेळोवेळी पाठविले होते. दरम्यान, टाकीचा राडारोडा उचलण्यास जवळपास महिनाभराचा अवधी लागणार आहे. त्यानंतर या जागेवर अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या लागू नयेत, यासाठी कॅन्टोन्मेंन्ट बोर्डाच्या अधिकारी व सदस्यांनी यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्यावे, अशी अपेक्षा खडकीकरांकडून व्यक्त होत आहे.
टाकी पडण्यासाठी ठेवले लिंबू
शनिवारी दोन पोकलेनद्वारे टाकी न पडल्याने दोन क्रेन मागवण्यात आले होते. त्याच्या सहाय्याने टाकी पाडण्याअगोदर टाकीच्या बाजुला ठेकेदाराकडून लिंबू ठेवले होते. जे काम दोन पोकलेन करू शकले नाही ते काम लिंबूद्वारे होईल, अशी त्यांची आशा होती. मात्र, चार मशीनचा जोर लावूनही ती टाकी पडली नाही. त्यामुळे ते लिंबू वाया गेल्याचे परिसरात बोलले जात आहे.