पालिकेचा सुधारित अंदाज : आयसीयू, व्हेंटिलेटरची कमतरता भासणार
पुणे – शहरातील करोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता 31 जुलैअखेर शहरात सुमारे 40 हजार 906 रुग्ण असतील, असा अंदाज महापालिकेने व्यक्त केला आहे. शहरात सध्या बाधित दुप्पट होण्याचा कालावधी 19 दिवसांवर गेला आहे. तर बरे होणाऱ्या रुग्णांची टक्केवारी 67 टक्के आहे. या विश्लेषणावरून महापालिकेने हा अंदाज व्यक्त केला असून, त्या दृष्टीने उपचारांसाठी खाटांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.
बाधितांच्या वाढीचा वेग लक्षात घेऊन पालिकेने अंदाज व्यक्त केले होते. त्यानुसार, 3 जूनपर्यंत 6,936 बाधित अपेक्षित होते. तर प्रत्यक्षात बाधितांचा आकडा 7,009 होता. तर, यामध्ये 2,900 जण सक्रिय बाधित असतील, असा अंदाज होता. पण प्रत्यक्षात 2,389 जण बाधित होते. त्यामुळे यापूर्वीच्या अंदाजांची आकडेवारी बदलण्यात आली आहे. त्यानुसार, आता रुग्ण दुपटीचा कालावधी, बरे होऊन घरी जाणारे व्यक्ती, तसेच प्रत्यक्ष शहरातील सक्रिय बाधित या माहितीच्या आधारावर 31 जुलैपर्यंत किती बाधित वाढतील, याचा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे.
सक्रिय बाधितांची संख्या चुकली
महापालिकेने जूनचा व्यक्त केलेला अंदाज बरोबर आला असला, तरी सक्रिय बाधितांचा आकडा चुकला आहे. या अंदाजानुसार एकूण बाधित 23 हजार, तर सक्रिय बाधित 9,743 असा होता. त्यानुसार, पालिकेने 30 जूनपर्यंत आवश्यक खाटांची पूर्तता केली आहे. सध्या अडीच हजारांवर सक्रिय बाधित असले, तरी 15 हजार खाटांची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, जुलैमध्ये हा आकडा 18 हजारांच्या घरात जाणार असल्याने बेडची सुविधा वाढवावी लागणार आहे. अंदाजानुसार ही आकडेवारी बरोबर ठरल्यास 31 जुलै रोजी शहरात 282 आयसीयू बेड आणि 172 व्हेंटिलेटरची कमतरता भासेल.