पुणे – देशात गणित विषय शिकवणाऱ्या एकूण शिक्षकांपैकी ४१ टक्के शिक्षकांनी पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला नाही. किंवा गणित या विषयाचा अधिकृतरीत्या अभ्यास केलेला नाही, अशी बाब टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधील सेंटर ऑफ एक्सलन्स इन टीचर एज्युकेशनच्या सर्वेक्षणानुसार सादर केलेल्या अहवालातून उघड झालेली आहे.
टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस मधील सेंटर ऑफ एक्सलन्स इन टीचर एज्युकेशनने प्रत्येक मुलासाठी योग्य शिक्षक या विषयावर संशोधन केले होते. आठ राज्यांतील सरकारी आणि खासगी शाळांमधील ३५ ते ४१ टक्के गणित शिक्षकांकडे पदवी स्तरावर गणित हा विषय नव्हता. प्रत्येक मुलासाठी योग्य शिक्षक हा अहवाल महाराष्ट्र, बिहार, आसाम, छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, मिझोरम, तेलंगणा या राज्यांमध्ये केलेल्या सर्वेक्षणांवर आधारित आहे.
सर्वेक्षणात ४२२ शाळा, ३६१५ शिक्षक, ४२२ मुख्याध्यापक, ६८ शिक्षक शिक्षण संस्था आणि बी.एड.चे शिक्षण घेणाऱ्या १ ह्जार ४८१ विद्यार्थी शिक्षकांचा समावेश होता. अहवालात यूडायस प्लस २०२१-२२, नियतकालिक श्रम बल सर्वेक्षण २०२१-२२ सह प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील डेटा वापरण्यात आलेला आहे.
संस्थेने मांडलेले ठळक मुद्दे
– प्राथमिक शाळांतील केवळ ४६ टक्के शिक्षकांकडे योग्य व्यावसायिक पात्रता
– ईशान्येकडील राज्यांमध्ये अजूनही शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा अपुऱ्या
– खासगी क्षेत्रातील शिक्षकांपैकी ५० टक्के जणांकडे लेखी कागदपत्रे नाहीत
– शारीरिक शिक्षण, संगीत आणि कला या विषयांसाठी शिक्षकांची मोठी कमतरता
– ३५ टक्के गणित व इंग्रजीसाठी ३१ टक्के आणि प्रादेशिक भाषांमध्ये ३० टक्के शिकवण्यासाठी पात्र शिक्षकांची आवश्यकता