प्रमोद बाणखेले यांना सदिच्छा भेटीत माहिती
रांजणी – एमएसआरडीसीच्या अंतर्गत पुणे जिल्ह्यातील राजगुरूनगर आणि नगर परिसरातून समृद्धी महामार्गाचे काम होणार आहे.
पुण्यातील रिंगरोड तसेच मुंबई, पुणे महामार्गावर सध्या चालू असलेल्या महत्त्वाकांशी प्रकल्पाबाबत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड आणि पुणे जिल्हा उत्तर ग्रामीणचे भाजपचे सचिव प्रमोद हरिभाऊ बाणखेले यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली.
मुंबई येथे डॉ. अनिलकुमार गायकवाड यांच्या निवासस्थानी त्यांची महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या एमडी पदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रमोद बाणखेले यांनी सत्कार केला.
यावेळी झालेल्या चर्चेत डॉ. अनिल कुमार गायकवाड यांनी पुणे जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाअंतर्गत होणार्या कामांबाबत बाणखेले यांना सविस्तर माहिती दिली. डॉ. गायकवाड म्हणाले येत्या काही महिन्यात पुणे ते नाशिक दरम्यान समृद्धी महामार्गाला जोडणारा रस्ता होणार असून त्या दृष्टीने भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.