पुणे – मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्ट, हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट, श्री गजलक्ष्मी ट्रस्ट आणि आम्ही पुणेकर संस्था यांच्या वतीने आणि ‘रायडर्स ऑफ दक्खन’ यांच्या सहकार्याने 75 रायडर्स गणेशोत्सवात वैद्यकीय सेवेसाठी सज्ज झाले आहेत. गणेशोत्सवात गर्दीच्या विविध ठिकाणी 40 रुग्णवाहिकादेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ज्या ठिकाणी रुग्णवाहिका पोहोचू शकत नाही, तिथे दुचाकीस्वार वैद्यकीय सुविधा देणार आहेत.
‘आरोग्यसेवा आपल्या दारी’ अंतर्गत या अभियानाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते फरासखाना पोलीस स्टेशन येथून झाला. यावेळी पोलीस उपायुक्त संदीपसिंह गील, तुळशीबाग सार्वजनिक गणपती मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष विकास पवार, हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, नितीन पंडित, गजलक्ष्मी ढोल ताशा पथकाचे प्रमुख केतन देशपांडे, साई सामाजिक सेवा संस्थेचे श्रीनिवास काबरा आदी उपस्थित होते. डॉ. प्रियांक जावळे, विठ्ठल बोडखे, नानासाहेब ओव्हाळ, डॉ. सुनील केलगणे, डॉ. स्वप्नाली जेंगते, विशाल रेड्डी, राम झाकडे, सत्यवान लंगर यांची टीम उपक्रमात सक्रिय कार्यरत राहणार आहे.
कोठे साधावा संपर्क…
गरजूंनी 108 नंबर वर संपर्क साधल्यास मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येईल. फरासखाना पोलीस स्टेशन, बाबू गेनू, कसबा गणपती मंडळ, केसरीवाडा, गरुड गणपती, टिळक रस्ता, पुणे जिल्ह्यातील अष्टविनायक या ठिकाणी रुग्णवाहिका असणार आहे. भाविकांनी 108 क्रमांकावर संपर्क साधावा. डॉक्टर, नर्स, प्रथमोपचार, आपत्कालीन सुविधा पूर्ण मोफत दिल्या जाणार असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.