पुणे – सार्वजनिक गणेशोत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार शनिवार (दि.23), रविवार (दि.24), मंगळवार (दि.26), बुधवार (दि.27) आणि गुरुवार (दि.28) असे पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरता येणार आहे.
ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यांचा वापर रात्री बारा वाजेपर्यंत करण्यासाठी शासनाने वर्षभरातील 15 दिवस निश्चित केले आहे. यातील पाच दिवस हे गणेशोत्सवासाठी आहेत. शासनाच्या आदेशानुसार, गणेशोत्सवातील दि.23 सप्टेंबर (पाचवा दिवस), दि.24 (सहावा दिवस), दि. 26 (आठवा दिवस) दि.27 सप्टेंबर (नववा दिवस) आणि दि.28 सप्टेंबर (अनंत चर्तुदर्शी) असे पाच दिवस निश्चित केले आहेत.
मात्र, ही परवानगी देताना न्यायालयाने घातलेल्या ध्वनिक्षेपकाच्या आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत.