पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी पुणे मुक्कामी असतील. त्यावेळी पालखी मंदिर परिसरात महापालिकेकडून सुरक्षेसाठी 40 सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. प्रामुख्याने पालखी विठोबा मंदिर आणि निवडुंग्या विठोबा मंदिर परिसरात हे कॅमेरे शहर पोलिसांच्या सुचनेनुसार बसविण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाकडून देण्यात आली.
या दोन्ही पालख्या येत्या दि.22 आणि 23 जून रोजी पुणे मुक्कामी येत आहेत. या कालावधीत दोन्ही पालख्यांसोबत जवळपास 10 ते 12 लाख वारकरी शहरात मुक्कामी असतात. याशिवाय या पालख्यांच्या दर्शनासाठी पुण्यासह आसपासच्या गावांमधील भाविकही मोठ्या प्रमाणात या दोन्ही पालख्या मुक्कामी असलेल्या भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर आणि निवडुंग्या विठोबा मंदिरात दर्शनासाठी उपस्थित राहतात. या कालावधीत शहरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे.