पुणे : पुण्यात दररोज दारोदारी जाऊन कचरा संकलन करणाऱ्या “स्वच्छ’ संस्थेच्या कचरावेचकांनी वारकऱ्यांसोबत वारीमध्ये सहभाग घेत रस्त्यावरील स्वच्छतेत हातभार लावला. भवानी पेठ भागातील निवडुंग्या विठोबा मंदिर आणि पालखी विठोबा मंदिर परिसरात “स्वच्छ’च्या कचरावेचकांनी वारकऱ्यांसोबत शून्य कचरा निर्मितीचा संदेश दिला.
करोना काळातही आपल्या कामात खंड पडू न देता शहराच्या स्वच्छतेसाठी आणि आरोग्यासाठी झटणाऱ्या कष्टकऱ्यांनी दोन वर्षांनी आलेल्या वारीच्या पदयात्रेत सहभाग घेतला. पुणे महापालिकेसोबत “हरित वारी’ करण्यासाठी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोनही पालख्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवत कचरा वेचकांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. पुणे मनपाचे वरिष्ठ आरोग्य निरीक्षक मुख्तार सय्यद, आरोग्य निरीक्षक संतोष कदम, मुकादम फिरोज कादरी यांच्या साथीने स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यात आले.
वारकऱ्यांसोबत भजन म्हणत रस्त्याची स्वच्छता करीत “स्वच्छ’च्या कचरावेचकांनी वारीचा आनंद लुटला. त्याचबरोबर 1 जुलै, 2022 पासून अंमलबजावणी होणाऱ्या “सिंगल युझ प्लॅस्टिक बॅन’ कायद्याअंतर्गत पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या प्लॅस्टिक विरोधात जनजागृती केली. यावेळी परभणी जिल्ह्यातून आलेल्या, गेली 20 वर्षे वारीत सहभागी होणाऱ्या द्वारकाबाई घुले यांचा अनोखा फंडा यावेळी पहायला मिळाला. कचरा निर्माण होऊ नये यासाठी स्वतःची भांडी, ताट, वाट्या घेऊन त्या वारीमध्ये सहभागी होतात, असे त्यांनी सांगितले. विठ्ठलभेटी जाताना कचरा करणे योग्य नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
दरवर्षी हजारोंच्या संख्येने वारकरी मोठा प्रवास पायी करतात. येथे देण्यात येणाऱ्या फुडपॅकेटस किंवा अन्य पॅकबंद गोष्टींमुळे पर्यावरणाला धोका पोहोचून अस्वच्छता पसरते. वारीमध्ये पुनःवापर आणि पुनः चक्रीकरण होऊ शकणाऱ्या गोष्टींचा वापर झाला तरच खऱ्या अर्थाने आपला नमस्कार माऊलीचरणी पोहोचेल.
– विमल ससाणे, (कचरावेचक, भवानी पेठ, “स्वच्छ’ संस्था)