नीरा – येथे ग्रामपंचायतीच्या वतीने दिव्यांग लाभार्थ्यांना 5 टक्के निधीप्रमाणे सुमारे 4 लाख रुपयांचा निधी बॅंकेच्या खात्यात जमा करण्यात आला. प्रहार अपंग संघटनेचे राज्याध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी वारंवार पाठपुरावा केल्याने हा निधी जमा केला गेला आहे.
करोनाच्या भीतीमुळे हाताला काम नसल्याने अशा दिवसांत नीरेतील दिव्यांगांना अनुदान मिळाल्याने त्यांना याचा हातभार लागणार आहे. करोनाचा प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र लॉक डाऊन असल्याने अपंगांच्या हालचालीवर मर्यादा आल्या आहेत.
हाताला काम नसल्याने दोन वेळचे जेवण तरी त्यांना वेळेत मिळावे; याचा विचार करून प्रहार अपंग संघटनेचे राज्याध्यक्ष सुरेखा ढवळे यांनी ग्रामसेवकांना वारंवार संपर्क करून अपंगांच्या निधी देण्याचे विनंती केली. प्रहारच्या मागणीनुसार सरपंच दिव्या पवार व ग्रामसेवक मनोज ढेरे यांनी मंगळवारी अपंगांच्या समस्येचा निर्णय घेतला.
मंगळवारी (दि. 7) नीरा ग्रामपंचायतीने 113 दिव्यांग लाभार्थींना 5 टक्केप्रमाणे प्रत्येकी 3500 रुपयांप्रमाणे रक्कम खात्यामध्ये जमा करण्यात आली. लाभ देताना ज्यांच्याकडे ऑनलाइन प्रमाणपत्र आहे व ग्रामपंचायत दप्तरी नोंद आहे त्यांनाच लाभ देण्यात आला.
यावेळी काही दिव्यांग बांधवाची खाती पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत असल्याने 2 लाख 80 हजार रुपये व बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये 1 लाख 15 हजार 500 प्रमाणे वर्ग करण्यात आले असल्याचे ग्रामसेवक मनोज ढेरे यांनी सांगितले.