मुंबई – राज्यभरात करोना व्हायरस थैमान घालत असून आतापर्यंत १२९७ रुग्ण आढळले आहेत. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी करोनाची टेस्ट केली असल्याची माहिती समोर येत आहे. याचे रिपोर्ट अमित देशमुख यांनी ट्विटरवर शेअर केले आहेत.
अमित देशमुख यांना ताप आणि खोकला येत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने करोनाची टेस्ट केली आहे. मंगळवारी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात करोना टेस्ट करून घेतली आहे. करोनाची टेस्ट निगेटिव्ह आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अमित देशमुख म्हणाले कि, खोकला आणि ताप आल्याने कोविड-19 चाचणी करून घ्यावी, असे डॉक्टरांनी सांगितल्याने ही चाचणी जे.जे. रुग्णालयातल्या फिवर क्लिनिक येथे करून घेतली होती. वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या सल्ल्याने ही टेस्ट झाली होती. आज रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. काळजीचे कारण नाही. आणखी चार दिवस घरुन काम पाहणार आहे. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने कार्यालयातून काम पाहता येईल. वैद्यकीय शिक्षण मंत्री या नात्याने कार्यरत असताना आपल्याला लागण झाल्यास इतरांना प्रादुर्भाव होऊ नये. त्याचप्रमाणे कुटुंबियांनाही याचा त्रास होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या दृष्टीने मी ही चाचणी करून घेतली आहे, अशी माहिती त्यांनी सांगितली आहे.
खोकला आणि नंतर ताप आल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काल मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील फिवर क्लिनिक येथे #coronavirus ची टेस्ट करून घेतली. माझी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. काळजीचे कारण नाही. आणखी चार दिवस घरून काम पाहणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री @AmitV_Deshmukh यांची माहिती pic.twitter.com/l3NCM3D1cJ
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 8, 2020
तसेच ज्यांना सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे दिसत असतील त्यांनी तातडीने या ठिकाणी जाऊन करोना तपासणी करून घ्यावी. आजार लवकर लक्षात आल्यास लवकर उपचार करणे आणि लवकर बरे होणे शक्य आहे. त्यामुळे अधिकाधिक लोकांनी पुढे यावं, असे आवाहनही अमित देशमुख यांनी केले आहे.