सातारा – लंडनमधून आणण्यात येणारी छत्रपती शिवरायांची वाघनखे येथील श्री शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये ठेवली जातील. या संग्रहालयात वाघनखे ठेवणे सातारकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. या वाघनखांचे शिवप्रेमींच्यावतीने स्वागत करतो, असे खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी सांगितले.
मात्र, काही प्रवृत्ती या वाघनखांच्या सत्यतेवर विनाकारण चर्चा करत आहेत. टीका करणाऱ्यांनी वाघनखांचे महत्त्व समजून घ्यावे, असा टोलाही त्यांनी लगावला. राजेशिर्के म्हणाले, “”छत्रपती शिवरायांच्या ऐतिहासिक पराक्रमाचा साक्षीदार असणारी ही वाघनखे लंडन येथून तीन वर्षाच्या करारावर महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. ती वाघनखे मराठा साम्राज्याची थोरली गादी सातारा, मराठा साम्राज्याची धाकटी गादी कोल्हापूर, महाराष्ट्राची आर्थिक राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर येथे ठेवली जाणार आहेत.” ऐतिहासिक वाघनखे संग्रहालयात ठेवली जात असताना हे संग्रहालय अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असायला हवे, अशी मागणी त्यांनी केली. वाघनखांचे आगामी काळात साताऱ्यात होणारे आगमन हा क्षण तमाम सातारकरांसाठी तसेच तमाम महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आहे.
लंडन येथून छत्रपती शिवरायांनी अफजलखानाच्या वधावेळी वापरलेली वाघनखे महाराष्ट्रात आणली जात आहे हे सातारा व कोल्हापूर येथील राजघराण्यांसह मुंबई व नागपूर राजधान्यांसह महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. असे असताना काही प्रवृत्ती या वाघनखांच्या सत्यतेवर विनाकारण चर्चा करत आहेत. ही चर्चा न करता त्यांनी आपल्या राज्यकारभारात शिवरायांनी जो धोरणीपणा दाखवला तो अंगिकारावा. विनाकारण बाष्कळ चर्चा करू नये, वाघनखांच्या तपासासाठी महाराष्ट्रात दिग्गज इतिहासतज्ज्ञ आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. वाघनखांच्या सत्यतेबाबत राजकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्या वक्तव्याचा सुहास राजेशिर्के यांनी नाव न घेता समाचार घेतला.