नवी दिल्ली: देशातील करोनाबाधितांच्या संख्येत दिवसागणिक मोठी भर पडत असली तरी बाधित करोनामुक्त होण्याच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली आहे. देशात गुरुवार सकाळपासून 24 तासांत तब्बल 34 हजार 602 रुग्ण बरे झाले. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी एकाच दिवसात करोनामुक्त होणाऱ्यांचा नवा उच्चांक नोंदला गेला.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या 4 लाख 40 हजारांहून अधिक सक्रिय बाधित आहेत. तर आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची संख्या 8 लाख 17 हजारांवर पोहोचली आहे.
करोनामुक्त आणि सक्रिय बाधितांच्या संख्येतील फरक 3 लाख 77 हजारांच्या आसपास आहे. देशातील करोना संसर्ग झालेले 63.45 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. आणखी 740 रुग्ण दगावल्याने देशातील करोनाबळींची संख्या 31 हजारांवर गेली आहे. अर्थात, मागील काही दिवसांपासून देशातील करोनामृत्यू दरात घट होत आहे. तो दर सध्या 2.38 टक्के इतका आहे.