अल्पवयीन मुलीवर पित्याचा अत्याचार
पुणे – परिचय आणि नात्यातील व्यक्तींकडूनच अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. यामुळे घराच्याबाहेर मुलींवर सुरक्षेचे प्रश्नचिन्ह उभे असताना आता घरातही सुरक्षित नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रक्ताच्या नात्यातील व्यक्तींकडून केल्या जाणाऱ्या अत्याचाराचे नवे आव्हान पोलिसांपुढे उभे आहे.
पहिल्या प्रकरणात बिबवेवाडीत वडिलांनीच आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून मुलीनेच त्याच्याविरोधात फिर्याद दिली आहे. मुलगी 9 वर्षांची असतानाच तिच्या आईचे निधन झाले. वडील मोलमजुरीचे काम करतात. घरात दुसरी कुठलीही व्यक्ती नाही. मुलगी आणि वडिल असे दोघेच राहतात. गेल्या सहा महिन्यांपासून वडिलांकडून मुलीला शारीरिक अत्याचाराला सामोरे जावे लागले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन
शनिवार पेठेत घडलेल्या घटनेत आरोपीने अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. तसेच आरोपीने त्या मुलीस तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत तिचा विनयभंग करत अश्लील वर्तन केले. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी अमन खान (रा. तोफखाना, साईबाबा मंदिराजवळ) यास अटक केली आहे.
चिमुकलीवर अत्याचार
पाषाण येथे एका अनोळखी व्यक्तीने सात वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केले. मुलगी खेळत असताना आरोपीने तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.