नवी दिल्ली – लाचखोरीचा आरोप असणाऱ्या भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) चार अधिकाऱ्यांना सीबीआयने अटक केली. त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर टाकण्यात आलेल्या छाप्यांवेळी तब्बल 3 कोटी रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. एवढेच नव्हे तर, नोटा मोजण्याची मशिनही हस्तगत करण्यात आली.
मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये रूजू असणाऱ्या एफसीआयच्या चार अधिकाऱ्यांनी एका कंपनीच्या प्रलंबित बिलांची रक्कम जारी करण्यासाठी दीड लाख रूपयांची लाच मागितली. त्याविषयीची तक्रार मिळाल्यानंतर सीबीआयने पुढील कारवाई केली.
हरिष हिनोनिया, अरूण श्रीवास्तव, मोहन पराते आणि किशोर मीना या लाचखोर अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याशी संबंधित ठिकाणांची झाडाझडती घेण्यात आली. त्यावेळी प्रचंड रोकड हाती आली. त्याशिवाय, सोने आणि चांदीचा किलोभर साठाही जप्त करण्यात आला.
छाप्यांवेळी लाचखोरीच्या रकमांचा तपशील असणारी एक डायरी सीबीआयला मिळाली. त्याआधारे पुढील तपास करण्यात येत आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना भोपाळमधील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 2 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली.