नवी दिल्ली- धुम्रपान करणाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर तो गंभीर होण्यात आणि रुणाच्या मृत्यूची शक्यता 50 टक्के अधिक असते. त्यामुळे धूम्रपान करणं बंद करणारा व्यक्ती करोनासोबतच कर्करोग, हृदयरोग आणि श्वसनाच्या आजारांपासून होणारा धोका कमी करू शकतो, असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस अधानॉम घेब्रेयेसस यांनी सांगितले.
जागतिक आरोग्य संघटनेने धूम्रपान सोडण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेला सर्व जगाने पाठिंबा द्यावा आणि तंबाखूमुक्त वातावरण निर्माण करावे, त्यासाठी नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवावी, त्यांना धूम्रपान सोडण्यासाठी आवश्यक मदत आणि पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
जागतिक आरोग्य संघटनेने धूम्रपान सोडा ही मोहीम वर्षभर सुरू केली आहे. त्यात गेल्या पाच महिन्यात एक अब्जहून अधिक नागरिकांनी त्यांच्या टुलकीटचा वापर केला आहे. ज्या लाखो जणांना धूम्रपान सोडायचे आहे. मात्र, त्यासाठी सहाय्याची गरज आहे अशांसाठी ही मोहीम जागतिक आरोग्य संघटनेने सुरू केली आहे.