नगर -शहरातील विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन गंगाधर शास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयात उघडलेल्या गुरु आनंद कोविड सेंटरमधून आज 27 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. या सेंटरमधून करोनाबाधित रुग्णांना अत्यंत चांगला विश्वास देण्यात आल्याची भावना मर्चंट्स बॅकेचे संचालक अमित मुथा यांनी व्यक्त केली.
मर्चंट बॅंकेचे संचालक कमलेश भंडारी, धनेश कोठारी, प्राचार्या अंजली देशमुख, डॉ. समीर होळकर, विजय विधावे, रोषण चोरडिया, अमित काबरा, शैलेश मुनोत आदी यावेळी उपस्थित होते. गुणे आयुर्वेद महाविद्यालयातील कोविड सेंटरमध्ये 30 बेडचे गुरु आनंद कोविड सेंटर आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकाराने सुरु करण्यात आले आहे. करोना विषाणूचा फैलाव शहरात मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक रुग्णांना उपचारासाठी ताटकळत बसावे लागत होते.
त्यामुळे आमदार जगताप यांच्या संकल्पेतून अत्यल्प दरात येथे करोनाबाधित रुग्णांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्राचार्य अंजली देशमुख म्हणाल्या, “”करोना होऊच नये, यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. हा संसर्ग आजार आहे. करोना झाल्यानंतर रुग्णांनी घाबरू नये. आवश्यक असलेले उपचार घेणे गरजेचे आहे. आयुर्वेद कॉलेज येथील गुरु आनंद कोविड सेंटरमध्ये रुग्णांना दर्जेचा आहार, आयुर्वेदीक काढा, योगा व उपचार दिले जात आहेत.”