नागपूर -गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी शनिवारी धडक आणि यशस्वी मोहीम राबवत तब्बल 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये एका नक्षलवादी म्होरक्याचाही समावेश असल्याचे समजते.
गडचिरोलीमधील मरदिनटोला जंगलात नक्षलवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या सी-60 कमांडो पथकाने शोधमोहीम हाती घेतली. कमांडो पथकाला पाहून नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला.
त्याला कमांडो पथकाने जोरदार प्रत्युत्तर दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये चकमक झडली. ते ठिकाण महाराष्ट्र-छत्तीसगढ सीमेलगत घनदाट जंगलात असल्याने चकमकीशी संबंधित माहिती तातडीने मिळत नव्हती. सुरुवातीला 4 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली.
चकमक थंडावल्यानंतर कमांडो पथकाने परिसरात शोध घेतला. त्यावेळी 26 नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. एवढ्या मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांचा खात्मा हे पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांची ओळख तातडीने पटू शकली नाही.
परिसरात आणखी नक्षलवादी दडले असल्याच्या शक्यतेने रात्री उशिरापर्यंत कमांडो पथकाने मोहीम सुरू ठेवली. चकमकीची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त सुरक्षाबळ जंगलात धाडण्यात आले. दरम्यान, चकमकीत 4 पोलीस कमांडो जखमी झाले. त्यांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने नागपूरला हलवण्यात आले.