गडचिरोली- गडचिरोलीत माओवाद्यांना स्फोटक साहित्यांचा पुरवठा करणा-या एका टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीच्या मुसक्या आवळल्यामुळे मोठा घातपाताचा कट उधळण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी चौघांना अटक करण्यात आले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
राजू गोपाल सल्ला, काशिनाथ ऊर्फ रवि मुल्ला गावडे, साधू लच्चा तलांडी, मोहम्मद कासीम शादुल्ला अशी (करीमनगर, तेलंगणा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर छोटू ऊर्फ सिनू मुल्ला गावडे हा आरोपी सध्या फरार आहे. गडचिरोली पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.
हिंसक कारवायात वापरण्यात येणारे बी जी एल तसेच हॅंडग्रेनेड आणि बॉम्ब तयार करण्यासाठी कार्ड एक्स वायर अतिमहत्त्वाची असते. या कार्डेक्स वायरचे 3 हजार 500 मीटर लांबीचे दहा बंडल माओवाद्यांना पुरवठा होणार असल्याची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे दामरंचा पोलीस ठाण्याच्या पार्टी व शीघ्र कृती दल (क्युआरटी) जवानांनी कारवाई करत मौजा भंगारामपेठा गावातून चार जणांना अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून 3 हजार 500 मीटर लांबीची कार्डेक्स वायर असलेले दहा बंडल जप्त केले आहेत.
सदर टोळी भंगाराम पेटा या गावातून संबंधित साहित्य घेऊन माओवाद्यांना देण्यासाठी जात होती. यावेळी दामरंचा पोलीस ठाण्यातील जवानांनी सापळा रचून आरोपिंच्या मुसक्या आवळल्या. चारही आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे. यामधून आणखी धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली.