गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यात काही दिवसांपासून नक्षलवाद्यांकडून पुन्हा हिंसक घटना घडवून दहशत निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.
नक्षलवाद्यांनी हालेवारा परिसरात आज (सोमवारी) पहाटे दोन पोकलेन, एक ट्रक आणि एक ट्रॅक्टरची जाळपोळ केली. दरम्यान, एका पोलीसाची नक्षलवाद्यांनी क्रूर पद्धतीने हत्या केल्याची घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आल्याने घबराट पसरली आहे.
छत्तीसगड राज्यातून नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील हालेवारा परिसरात प्रवेश केला. दोन दिवसात दोन वेगवेगळ्या घटना घडवून आणल्यामुळे सध्या एटापल्ली तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर जाळपोळीत वाहनांचे मोठे नुकसान झाले असून जवळपास दोन कोटी रुपयांच्या वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ केल्याचे समजते.
दरम्यान, एटापल्ली भागात सुरजागड लोह खनिज प्रकल्प सुरु आहे. याच्या विरोधातही नक्षलवादी नेहमी कारवाया करताना अनेक वेळा जाळपोळ केली जाते. दोन वर्षानंतर पुन्हा जाळपोळीची घटना समोर आली आहे.