भोसरी विधानसभा :411 केंद्रांवर 537 मतदान यंत्रे
एका उमेदवाराला 4 अर्ज दाखल करता येणार
विधानसभा निवडणुकीसाठी एका उमेदवाराला 4 उमेदवारी अर्ज कार्यालयीन वेळेत 4 ऑक्टोबर रोजी पर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शासकीय सुट्टी वगळता दाखल करता येणार आहेत. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला अर्जासोबत 10 हजार रुपयाची अनामत रक्कम भरावी लागेल. मात्र, उमेदवार अनुसुचित जाती प्रवर्गातील असल्यास पाच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
पिंपरी – निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली असून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून ते मतमोजणी होईपर्यंत ही निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये 2 हजार 466 अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. या कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली असून मतमोजणीनंतरच या कर्मचाऱ्यांना कामावरून सुट्टी मिळणार आहे.
निवडणुकीची आचारसंहीता जाहीर झाल्यापासूनच निवडणुकीच्या तयारीला वेग आला होता. शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेने खऱ्या अर्थाने विधानसभेच्या महासंग्रामाला सुरुवात झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदारसंघ हा सर्वाधिक चर्चेला असणारा मतदारसंघ आहे. त्यामुळे, या मतदारसंघातील निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पाडली जावी, यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. भोसरी विधानसभेसाठी पहिल्या दिवशी अद्याप एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. उमेदवाराने अर्ज दाखल केल्यापासून निवडणूक आयोगाची उमेदवारांच्या खर्चावर आयोगाची करडी नजर राहणार आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये 411 मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रावर सध्या प्रशासनाने 20 टक्के वाढीव या पद्धतीने ईव्हीएम मशीन उपलब्ध केल्या आहेत.
उमेदवारांच्या अर्ज माघारी नंतर किती उमेदवार रिंगणात राहतात यावर वाढीव मशीन मागवायच्या की नाही? याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. भोसरी विधानसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडली जावी, यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी काल शुक्रवारपासून विविध कामांसाठी 2 हजार 466 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. भोसरी येथील अण्णासाहेब मगर क्रीडांगण येथील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात 4 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारांना त्यांचे अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्ज भरताना तीन वाहने आणि पाच व्यक्तींनाच प्रवेश विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या बाहेर 100 मीटरच्या आत फक्त तीन वाहनांना प्रवेशाची मुभा देण्यात येणार आहे. तसेच उमेदवारी अर्ज सादर करतेवेळी उमेदवारासह फक्त पाच व्यक्तींनाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात प्रवेश मिळणार आहे.