सातारा -जिल्ह्यात बुधवारी (दि. 18) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार 246 नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला आहेत, तर 6 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गुरुवारी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 49 हजार 297 तर करोनाबळींची एकूण संख्या 1659 झाली आहे.
गेल्या महिना-दीड महिन्यात करोनाबाधितांची संख्या रोज कमी येत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत होता. अर्थात चाचण्यांचे प्रमाणही गेल्या काही दिवसांमध्ये कमी होते. दिवाळीनंतर आता चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याने बाधितांचा आकडाही वाढला आहे. काल आलेल्या 2272 अहवालांमध्ये बाधितांचे प्रमाण साडेदहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यातच करोनाबळी रोखणेही अद्याप शक्य झालेले नाही. दिवाळीमध्ये नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. अनेकांनी शासनाचे सर्व निर्बंध धुडकावल्याचे दिसत होते.
सलग सुट्ट्यांमुळे अनेक जण प्रवासासाठीही बाहेर पडल्याने सगळीकडे गर्दी दिसत होती. त्याचे परिणाम येत्या काही दिवसांत जाणवण्याची भीती व्यक्त होत आहे. सातारा तालुक्यामध्ये सातारा शहरात सदरबझार, शाहूनगर प्रत्येकी दोन, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, सोमवार पेठ, गुरुवार पेठ, सदाशिव पेठ, चिमणपुरा पेठ, व्यंकटपुरा पेठ, यादोगोपाळ पेठ, रामाचा गोट, विसावा नाका प्रत्येकी एक, इतरत्र 11, करंजे सहा, संभाजीनगर, खेड, दौलतनगर, वाखणवाडी प्रत्येकी दोन, कृष्णानगर, विकासनगर, देगाव, कोडोली, गारपीरवाडी, चिंचणेर, शिवथर, हिरापूर, सैदापूर, भरतगाववाडी, वर्ये, वनगळ प्रत्येकी एक, कराड तालुक्यामध्ये कराड शहरात सहा, वडगाव हवेली चार, मलकापूर तीन, मसूर दोन, खराडे, वाघोली, उंब्रज, अणे, मुंढे, पाल प्रत्येकी एक, पाटण तालुक्यात पाटण तीन, म्हावशी, विहे प्रत्येकी एक, फलटण तालुक्यामध्ये फलटण शहरात मेटकरी कॉलनी, लक्ष्मीनगर प्रत्येकी तीन, मंगळवार पेठ, शिवाजीनगर प्रत्येकी एक, इतरत्र दोन, शेरेचीवाडी, साखरवाडी प्रत्येकी सात, तरडगाव, वडजल प्रत्येकी दोन, वडले, सुरवडी, ताथवडा, विडणी, कोळकी, सुरवडी, चौधरवाडी, कुरवली खुर्द, धुळदेव, मिरेवाडी प्रत्येकी एक, खटाव तालुक्यात वडूज दहा, ललगुण सहा, बावकलवाडी, भुरकवडी, कुरोली प्रत्येकी एक, माण तालुक्यात म्हसवड पाच, बिदाल, दहिवडी, महिमानगड, ढाकणी प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यात वाठार किरोली 11, रहिमतपूर पाच, वाठार, सुर्ली प्रत्येकी चार, आर्वी, भोसे, जळगाव, न्हावी, रुई, ल्हासुर्णे, बिचुकले प्रत्येकी एक, जावळी तालुक्यात आगलावेवाडी 20, करंजे पाच, मामुर्डी, दुंद प्रत्येकी चार, मेढा, कुसुंबी प्रत्येकी दोन, कुसुंबी, सायगाव, कुडाळ, नांदगणे, सासपडे, सांगवी, गांजे प्रत्येकी एक, वाई तालुक्यात वाई शहर, भुईंज, कुंभारवाडी प्रत्येकी एक, खंडाळा तालुक्यात खंडाळा चार, शिरवळ, लोणंद प्रत्येकी एक, महाबळेश्वर तालुक्यात राजापुरी एक, इतर दहा, बाहेरील जिल्ह्यांमधील सांगली, बीड प्रत्येकी एक, असे एकूण 246 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
863 जण करोनामुक्त
जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेल्या तब्बल 863 नागरिकांना गुरुवारी घरी सोडण्यात आले. त्याचबरोबर 1552 जणांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्हा रुग्णालयातील 54, कराड उपजिल्हा रुग्णालयातील 70, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 163, कोरेगावातील 203, वाईतील 106, खंडाळा येथील 159, रायगावमधील 84, पानमळेवाडीतील 198, मायणीतील 83, महाबळेश्वरमधील 110, पाटणमधील 28, दहिवडीतील 50, खावलीतील 89, म्हसवडमधील 60, पिंपोडे येथील 36 व कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमधील 59 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
सहा बाधितांचा मृत्यू
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना फलटण येथील 55 वर्षीय पुरुष, भुरकवडी, ता. खटाव येथील 82 वर्षीय पुरुष, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना दहिवडी, ता. माण येथील 43 वर्षीय पुरुष, पुळकोटी, ता. माण येथील 75 वर्षीय महिला, बिदाल, ता. माण येथील 68 वर्षीय पुरुष, सोमंथळी, ता. फलटण येथील 60 वर्षीय पुरुष, अशा एकूण सहा बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. चव्हाण यांनी दिली.