कोरेगाव -कोरेगाव तालुक्यात गेल्या आठवड्यात गांजा तस्करीचे रॅकेट परीविक्षाधीन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी उद्ध्वस्त केल्यानंतर या रॅकेटच्या मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचा निर्धार त्यांनी केला. खटाव व माण तालुक्यातून चार जणांना अटक केल्यानंतर जेथून गांजा पुरवला जातो, त्या काळमळ वस्ती (पिलीव), ता. माळशिरस येथे बुधवारी (दि. 18) रात्री कारवाई करत मुख्य सूत्रधार लक्ष्मण रामू जाधव याला अटक केली.
त्याच्याकडून दोन लाख 95 हजार 410 रुपये किमतीचा 49 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा-लातूर महामार्गावर चिमणगाव गोठ्यानजीक होंडा ऍक्टिव्हा स्कूटरवरून गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती खोखर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी विशेष पथक तयार केले. होंडा ऍक्टिव्हा स्कूटर (एमएच-11-बीवाय-3091) वरून निघालेल्या हसिम नजीर झारी व सचिन तुकाराम मदने (रा. पुसेगाव) यांना शुक्रवारी (दि. 13) सायंकाळी ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून चार किलो 185 ग्रॅम गांजा, मोबाइल, असा मिळून 77 हजार 830 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी दहिवडीतील बाजार पटांगणाजवळच्या सुनील किसन जाधव व प्रकाश अशोक जाधव यांच्याकडून गांजा खरेदी करत असल्याची कबुली दिली होती. खोखर यांच्या पथकाने त्याच रात्री दहिवडीत जाऊन दोघांना अटक केली. त्यांच्या घरांच्या झडतीत 63 हजार 570 रुपयांचा
मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.
त्यांची चौकशी केली असता काळमळ वस्ती (पिलीव), ता. माळशिरस येथील लक्ष्मण जाधव याच्याकडून गांजा खरेदी करत असल्याची कबुली त्यांनी दिली होती. त्यानुसार खोखर यांच्या पथकाने बुधवारी रात्री काळमळ वस्तीत छापा टाकून जाधवला पकडले. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रितू खोखर, पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, सहाय्यक उपनिरीक्षक प्रल्हाद पाटोळे, हवालदार विजय जाधव, पोलीस नाईक धनंजय दळवी, अमोल सपकाळ, किशोर भोसले, साहिल झारी, इंद्रजित भोसले, अजय गुरव, तुषार बाबर, नीलेश जांभळे, शंकर पाचांगणे व होमगार्डस्च्या पथकाने ही कारवाई केली.