पिरंगुट – मुळशी तालुक्यात दिवसेंदिवस करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढत आहे. आज दिवसभरात तालुक्याच्या विविध भागांत एकूण 22 रुग्ण आढळून आले, त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या 134 झाली आहे. गटविकास अधिकारी संदीप जठार आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज तालुक्यात 14 पुरुष, तर 8 महिला असे एकूण 22 रुग्ण आढळले आहेत.
यामध्ये जांबे गावात एक, बावधनमध्ये दोन, पिरंगुटमध्ये दोन, हिंजवडी येथे तीन, नांदेत दोन, भूगावमध्ये दोन, सूसमध्ये दोन, उरवडे येथे एक, मारुंजीत एक, नेरेत तीन, हाडशीत दोन, तर माणमध्ये एक रुग्ण सापडला आहे. करोना बाधितांची वाढती संख्या चिंताजनक आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे, तसेच घराबाहेर पडताना मास्कचा वापर केला पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग पाळले पाहिजे, असे आवाहन गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी केले आहे.
आत्तापर्यंत तालुक्यात एकूण रुग्ण संख्या 134 झाली असून, यापैकी 41 रुग्ण बरे झाले आहेत. तालुक्यात एकही मृत्यू झालेला नाही. यामुळे नागरिकांनी घबरून जाऊ नये. स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.