पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरात आज एकाच दिवशी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. तर रुग्णसंख्येमध्येही 352 नवीन रुग्णांची भर पडल्याने शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने पाच हजारांचा टप्पा ओलांडला आहे. शहराज आजपर्यंत 5203 जणांना करोनाची लागण झाली आहे. मंगळवारी झालेल्या मृत्यूंमुळे “करोना’ने बळींचे शतक केले आहे. यात शहरातील 72 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेणाऱ्या 32 अशा एकूण 104 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जून महिन्याच्या मध्यापासून शहरात “करोना’चा उद्रेक दिसून येत आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच “करोना’ने अक्षरशः थैमान घातले आहे. गेल्या सात दिवसांमध्ये दोन हजारांहून अधिक “करोनाबाधित’ आढळले आहेत. 30 जून रोजी शहरातील एकूण “करोनाबाधितां’ची संख्या 3029 इतकी होती. जुलै महिन्याच्या पहिल्या सात दिवसांमध्ये 2174 रुग्णांची भर पडली आहे. तसेच मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे.
शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. शहरात मंगळवारी 352 जणांना करोनाची लागण झाली. त्यामध्ये शहरातील 342 तर शहराबाहेरील 10 रुग्णांचा समावेश आहे. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालयांत 2084 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 116 रुग्णांचा समावेश आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमधील मात्र शहराच्या बाहेर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 13 आहे. मंगळवारी शहरातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला.
शहरातील बौद्धनगर पिंपरी, शरदनगर चिखली, चिंचवड, सुखवाणी पिंपरी येथील चार पुरुषांचा मृत्यू झाला. तर पिंपरी येथील एका 75 वर्षीय महिलेचाही करोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
2492 जणांना मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी 1360 रुग्ण सौम्य लक्षणे असलेले आहेत. 1937 रुग्णांचे तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. दरम्यान, आज 232 रुग्णांना घऱी सोडण्यात आले. आजपर्यंत एकूण 3138 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
इंदोरीत करोनाने एकाचा मृत्यू
इंदोरी येथील 60 वर्षीय करोना रुग्णाचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. तालुक्यातील करोनामुळे मृत्यू पावलेला हा आठवा रुग्ण आहे. चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी 30 जूनला दाखल करण्यात आले होते. सोमवारी त्यांच्या प्रकृती खालवल्याने उपचार सुरू असताना मृत्यू झाला.