जाधववाडीमधील अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण
पिंपरी – महापौर राहुल जाधव यांच्या प्रभाग क्रमांक दोन जाधववाडीमधील अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी 22 कोटी 32 लाख रुपये खर्च येणार असून याबाबतच्या प्रस्तावाला आज (सोमवारी) झालेल्या विशेष सभेत स्थायी समितीने
मान्यता दिली.
महापौर राहुल जाधव जाधववाडीचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या प्रभागातील जाधववाडी, कुदळवाडीतील अस्तित्वातील अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती.
यामध्ये कृष्णाई इन्फ्रा या ठेकेदाराची 23 कोटी 89 लाखापेक्षा 7.60 टक्के कमी दराची निविदा प्राप्त झाली. सन 2018-19 च्या एसएसआर दरानुसार प्राप्त निविदा स्वीकृत म्हणजेच 22 कोटी 7 लाख रुपयांची होती. त्यामध्ये रॉयल्टी चार्चेस 10 लाख 35 हजार आणि मटेरियल टेस्टींग चार्जेस 14 लाख 58 हजार असे एकूण 22 कोटी 32 लाख 42 हजार रुपयांमध्ये रस्त्यांचे डांबरीकरण करुन घेण्यात येणार आहे. ठेकेदारासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने
मान्यता दिली.