शिक्षण आयुक्तांचे वेतन पथक अधीक्षकांना आदेश
पुणे – शाळांची चौकशी सुरू आहे अथवा शाळांबाबत तक्रारी दाखल आहेत, अशी कारणे पुढे करुन शिक्षकांचे वेतन थांबविणे योग्य नाही, असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत त्यांनी प्राथमिक शिक्षण संचालक व पुणे वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकांना आदेशच बजावला आहे.
आकुर्डी येथील सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर व यमुनानगर येथील श्री स्वामी विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यापासून वेतनच देण्यात आलेले नाही. या सुमारे 50 शिक्षकांसह शिक्षक नेते संभाजी शिरसाट, पिंपरी-चिंचवडच्या माजी उपमहापौर शैलजा मोरे, भाजप युवती शहराध्यक्षा तेजस्विनी कदम, अमोल गिते, मुख्याध्यापक राजू माळे, दत्तात्रय कुंजीर यांनी शिक्षण आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे व्यथा मांडली. तर, पथकाचे अधीक्षक राजेंद्र साठे जाणीवपूर्वक शिक्षकांची वेतन देयके दाखल करुन घेत नाहीत. शाळांच्या तक्रारींची कारणे देत उडवाउडवीची उत्तरे देतात. देयकात त्रुटी काढून ते प्रलंबित ठेवतात. यामुळे नाहक त्रास होतो, अशा भावना शिक्षण आयुक्तांकडे मांडण्यात आल्या.
नियमांची अंमलबजावणी करा
शाळांविरुद्ध तक्रारी असल्यास सक्षम अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी व त्यात तथ्य आढळून आल्यास नियमाप्रमाणे कारवाई करावी. वेतन देयके नियमाप्रमाणे योग्य असल्यास संबंधित शिक्षकांचे वेतन अदा करण्याबाबत वेतन पथकाच्या अधीक्षकांना निर्देश देण्यात यावेत, असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांना दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.