मेढा – जावळी तालुक्यातील करंजे, सावली, आसणी, भोगवली, केळघर, पुनवडी, केडंबे, वाळंजवाडी व वरोशी या गावांमधील तब्बल 22 ठिकाणी काल (दि. 7) मध्यरात्री घरफोड्या झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे. चोरांबे येथे चोरीचा प्रयत्न फसला असून, चोरटे गावातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले आहेत.
याबाबतची माहिती मिळताच मेढ्याचे सपोनि अमोल माने यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी 7 च्या सुमारास घटनास्थळी भेटी देऊन तपास गतिमान केला आहे. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला बोलावण्यात आले. जावळीत घरफोड्यांचे प्रकार अनेक वेळा घडले असले, तरी एकाच रात्रीत 22 घरफोड्या होण्याची ही पहिलीच वेळ असून, पोलिसांनी या गुन्ह्याचा तातडीने छडा लावावा, अशी मागणी होत आहे. सुदैवाने कोठेही अनुचित प्रकार घडला नसला, तरी ही टोळी मोठी असावी. त्यांनी बंद घरांची कुलपे व तिजोऱ्या फोडण्यासाठी आधुनिक साधनांचा वापर केल्याचा अंदाज आहे.
बंद घरांची टेहळणी करून चोरट्यांनी हे धाडस केल्याची चर्चा या गावांमध्ये आहे. चोरट्यांनी करंजे, सावली, भोगवली येथे प्रत्येकी दोन घरे, आसणीत आठ घरे, पुनवडीत, केळघर, वाळंजवाडी व वरोशी येथे प्रत्येकी एक घर आणि केडंबेत तीन घरे एका रात्रीत फोडली. यामध्ये लाखो रुपयांचा ऐवज लंपास झाल्याचा अंदाज असून, कोणाच्या घरातून किती ऐवज चोरीस गेला, हे नेमके समजू शकलेले नाही. या घरफोड्यांमुळे जावळीच्या पश्चिम भागात भीतीचे वातावरण झाले आहे.
सर्व नागरिकांनी सतर्क राहावे. संशयित दिसल्यास आमच्याशी संपर्क साधावा. कोणीही घाबरून जाऊ नये. रात्री-अपरात्री संशयास्पद हालचाली दिसल्यास थेट आमच्याशी संपर्क साधावा.
– अमोल माने, सपोनि, मेढा.