तिरुअनंतपुरम – आईने 27 दिवसापूर्वी जन्म दिलेल्या बाळाचा भिंदीवर डोके आपटून जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार केरळ मधील पथामामथिट्टा या भागातून समोर आला आहे. या बाळाचा प्रिमॅच्युअर जन्म झाल्यामुळे ते सारखे आजारी असायचे व सतत रडायचे त्यामुळे वैतागलेल्या आईने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत आरोपी आईला बेड्या ठोकल्या आहेत.
या घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की, 9 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. त्याच दिवशी दुपारी 11 वाजता या बाळाला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांना दाखवल्यानंतर बाळाला परत घरी सोडण्यात आले. मात्र बाळाचा प्रकृती त्यानंतर ढासळत गेली. अखेर त्याला तालुक्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्याचा मृत्यू झाला.
ही 21 वर्षीय आई एका आश्रमात स्वयंपाकाचे काम करत होती. येथेच तिच्या 45 वर्षीय प्रियकरासोबत ती राहत होती. या घटनेनंतर आश्रम चालवणारे फादर जोजी थॉमस यांनी या प्रकरणाला वाचा फोडली त्यानंतर त्यांच्या जवाबानंतर गुन्हा नोंदवून घेण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.