केडगाव – शिक्षक हा समाजातील महत्त्वाची जबाबदारी पार पाडणारा घटक असून, मुलांना घडवण्यासाठी काम करतो. त्यांच्या चांगल्या कामाची पावती मिळणे अपेक्षित असल्याने त्यांना दिले जाणारे पुरस्कार हा स्तुत्य उपक्रम आहे, असे प्रतिपादन रमेश थोरात यांनी केले.
दौंड तालुक्यातील 21 माध्यमिक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्याच्या कार्यक्रमाचे दौंड तालुका माध्यमिक शिक्षक संघ आणि टीडीएफ संघटनेच्या वतीने आयोजन करण्यात आले होते, यावेळी अध्यक्षस्थानावरून पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे चेअरमन आणि तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात बोलत होते.
केडगाव (ता. दौंड) येथे पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, पंचायत समितीचे उपसभापती नितीन दोरगे, संचालक सयाजी ताकवने, बाजार समितीचे सभापती दिलीप हंडाळ, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन नारायण जगताप, जी. के. थोरात, प्रसाद गायकवाड, मुकुंद भिसे, राजेंद्र जगताप आणि इतर मान्यवर उपस्थित होते.