महापालिकेकडून 19 तारखेला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

896 लसीकरण केंद्रांवर असणार व्यवस्था

पिंपरी  (प्रतिनिधी) – महापालिकेच्या वतीने पुढील रविवारी (दि. 19) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे. शहरात 896 लसीकरण केंद्रांमार्फत राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेसाठी 210 पर्यवेक्षक व 2 हजार 651 लसीकरण कर्मचारी नेमले आहेत, अशी माहिती अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी दिली.

विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी व 55 वैद्यकीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे. शहरात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ही मोहीम घेण्यात येईल. मोहिमेमध्ये 5 वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर उषा ढोरे यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी केले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्‍लबचे विविध स्वयंसेवक, महापालिका क्षेत्रातील विविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी, एमपीडब्लू, एएनएम, बालवाडी शिक्षिका, बालवाडी सेविका, क्रीडा शिक्षक, महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आदी स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

महापालिकेने शहरातील 5 वर्षांखालील सर्व मुलांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी शहरामध्ये एकूण 896 लसीकरण केंद्रांची स्थापना केली आहे. त्यापैकी सर्व महापालिका दवाखाने, रुग्णालये, मोठी खासगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी अशा 795 ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्रे, बस स्थानक, रेल्वे स्थानक अशा ठिकाणी 31 ट्रान्झीट लसीकरण केंद्र, वीटभट्टया, बांधकामे, फिरत्या लोकांची पाले आदी ठिकाणच्या मुलांसाठी 70 फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली आहे. तरी नागरिकांनी आपल्या घरातील व शेजारी राहणाऱ्या 5 वर्षांखालील बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने 1988 मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्‍चित केले. त्यानुसार राज्यात 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दरवर्षी राबविण्यात येत आहे. देशात 13 फेब्रुवारी 2011 नंतर आजतागायत एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही. भारताला पोलिओ निर्मूलनाचे प्रमाणपत्र मार्च 2014 मध्ये मिळाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.