पुणे – शाळांमध्ये सहजासहजी शिक्षकाची नोकरी मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी प्राथमिक शिक्षण पदविका (डी.एल.एड.) अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याकडे पाठ फिरवली आहे. विद्यार्थीच मिळत नसल्याने दरवर्षी डी.एल.एड.ची महाविद्यालये बंद पडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. यंदीही 21 महाविद्यालये बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
काही वर्षांपूर्वी डी.एल.एड. अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्पर्धा लागायची. महाविद्यालयात सहजपणे प्रवेशही मिळत नव्हते. मात्र, सन 2012 नंतर शिक्षक भरतीला बंदी घालण्यात आली. शिक्षक भरतीच होत नसल्याने डी.एल.एड. करुन काय उपयोग, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आला. डी.एल.एड. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधनही घालण्यात आले आहे. याबरोबरच शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परीक्षाही उत्तीर्ण होण्याची अट घालण्यात आलेली आहे.
पारदर्शकपणे शिक्षक भरती व्हावी यासाठी पवित्र प्रणालीचा अवलंब केला जात आहे. या सगळ्या चक्रातूनही शाळांमध्ये शिक्षक पदावर नोकरी मिळणे कठीण झाले आहे. खासगी संस्थांमध्ये अजूनही आर्थिक व्यवहाराशिवाय नोकरीच मिळत नसल्याचे प्रकार सुरू आहेत. या सर्व बाबींमुळे विद्यार्थ्यांनी डी.एल.एड.ला प्रवेश घेण्यासाठीच निरुत्साह दाखविला आहे. खासगी विनाअनुदानित महाविद्यालये चालविण्यासाठी खुप खर्च येतो आहे. विद्यार्थीच नसल्याने खर्चाचा डोलारा कसा काय सोसायचा, असा प्रश्न संस्थाचालकांना पडला आहे. 10 महाविद्यालयांनी विद्या प्राधिकरणाकडे बंदबाबतचे प्रस्ताव पाठविले आहेत.
विद्या प्राधिकरणाकडून अंतिम मान्यतेसाठी हे प्रस्ताव राष्ट्रीय शिक्षण परिषदेकडे पाठविलेले आहेत. तर 11 महाविद्यालयांनी यंदाच्या प्रवेश प्रक्रियेतच सहभाग घेतलेला नाही. त्यामुळे ही महाविद्यालयेही बंदच होणार आहेत, असे दिसून येत आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदाच्या (विद्या प्राधिकरण) वतीने डी.एल.एड.साठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीचा अवलंब केला जातो. मागील वर्षी डी.एल.एड. प्रवेशासाठी 595 महाविद्यालयांची नोंदणी केली होती. यात 32 हजार 647 एवढ्या प्रवेशाच्या जागा उपलब्ध करुन दिल्या होत्या. त्यातून केवळ 18 हजार 552 विद्यार्थ्यांनीच प्रत्यक्ष प्रवेश घेतले होते.
प्रवेशाच्या 1 हजार 540 जागाही घटल्या
यंदा सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात डी.एल.एड.च्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी 574 महाविद्यालयांनी नोंदणी केली आहे. यात 31 हजार 107 एवढ्या प्रवेशाच्या जागा दर्शविला आहेत. 16 शासकीय अनुदानित महाविद्यालयात 700 प्रवेशाच्या जागा आहेत. 97 खासगी अनुदानित महाविद्यालयात 4 हजार 577 जागा आहेत. 461 खासगी विनाअनुदानित महाविद्यालयात सर्वाधिक 25 हजार 830 एवढ्या प्रवेशाच्या जागा उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी पहिल्या प्रवेश फेरीत एकूण 7 हजार 787 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी (दि.27) संपणार आहे. त्यानंतर 5 जुलै रोजी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा 21 महाविद्यालये कमी झाली असून प्रवेशाच्या 1 हजार 540 जागाही घटल्या आहेत.