पुरंदरच्या विकासाला चालना
सासवड – राज्याच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय पावसाळी अधिवेशनात जुलै 2023 च्या पुरवणीमध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघातील दळणवळणाच्या सुविधांच्या विकासकामांसाठी 20 कोटी 39 लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संजय जगताप यांनी दिली.
पुरंदर- हवेली विधानसभा मतदारसंघामध्ये ऐतिहासिक, धार्मिक, पर्यटन स्थळांमुळे पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. मतदारसंघातील रस्ते, पूल आदी दळणवळणाच्या सुविधा चांगले होणे गरजेचे असल्याने तसेच याबाबत स्थानिक नागरिकांच्या मागण्यांचा विचार करून त्याबाबतचे प्रस्ताव दाखल करून निधींची मागणी केली होती. त्यानुसार निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनानुसार व आमदार संजय जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. भरीव निधीमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. पुरंदर मतदारसंघातील मंजूर कामे पुढीलप्रमाणे :- नाझरे सुपे – नाझरे क.प. ते काळा ओढा ते कोळविहिरे ग्रामीण मार्ग 140 वर नाझरे क. प गावाजवळ कऱ्हा नदीवर मोठा पुल बांधण्यासाठी 5 कोटी 39 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
सटलबवाडी – पिंगोरी – कोळविहिरे – नायगाव – माळशिरस रस्ता प्रजिमा 134 वर पुलाच्या बांधकामासाठी 5 कोटी रुपये. तसेच सारोळा – वीर – मांडकी – जेऊर रस्ता सुधारण्यासाठी 6 कोटी रुपये आणि पुरंदर तालुक्यातील राज्य मार्ग 120 ते दिवे – सोनोरी – कुंभारवळण – वाळुंज – नाझरे – पांडेश्वर रस्ता सुधारणा कामासाठी 5 कोटींचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संजय जगताप
यांनी दिली.