पुणे – पीएमपीमध्ये काम करताना कामात हलगर्जीपणा, सतत गैरहजर राहणे एकूणच ज्यांचे रेकॉर्ड खराब आहे, असा 36 कर्मचाऱ्यांवार थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर एकूण 142 कर्मचाऱ्यांवर बडतर्फ व नोटीस देण्यात आली असून, पीएमपी अध्यक्ष ऍक्शन मोडवर आले असून, पहिलीच कारवाई कर्मचाऱ्यांवर झाल्यामुळे पीएमपी प्रशासनात खळबळ उडाली आहे.
पीएमपीच्या ताफ्यात 9 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी संख्या आहे. त्यातील सुमारे 200 कर्मचारी मागील दोन महिन्यांत निलंबित झाले होते. दरमहा निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, पीएमपीचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी दोन आठवड्यापूर्वीच पीएमपी अध्यक्षपदाचा पदभार घेतला. त्यानंतर शहरातील विविध मार्गावर सुरू असलेली बससेवा कशा पद्धतीने सुरू आहे, प्रवाशांना सेवा चांगली मिळते का? हे पाहण्यासाठी सचिंद्र प्रताप सिंह यांनी स्वत: बसने प्रवास करत माहिती घेतली. तसेच सर्व अधिकाऱ्यांनाही कार्यालयात न बसता मार्गावर जाण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी काही कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या बेशिस्तपणा दिसून आला. तसेच नुकत्याच सुरू केलेल्या प्रवासी दिनादिवशी येणाऱ्या तक्रारींमध्ये चालक, वाहक आणि बसच्या तक्रारी दिसून आल्या. त्यानंतर अध्यक्षांनी थेट बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगाच उगारला.
ताफ्यातील जास्तीत जास्त बसेस मार्गावर संचलनात उपलब्ध व्हाव्यात, कामात कसून करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शिस्त लागावी, गैरहजेरीचे प्रमाणास आळा बसावा या दृष्टीने ही कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
छत्तीस कर्मचाऱ्यांवर कारवाई
सतात गैरहजर राहत असलेल्या 36 कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये 30 वाहक आणि 6 चालकांचा समावेश आहे. तसेच, कोणतीही पूर्वसूचना न देता शनिवारी (दि. 22) गैरहजर राहिलेल्या 142 कर्मचाऱ्यांना कडक शब्दात नोटिसा (आरोपपत्र) देण्यात आल्या आहेत. नोटिसा देण्यात आलेल्यांमध्ये 78 वाहक व 64 चालकांचा समावेश आहे. तर 2 चालक आणि वर्कशॉप विभागाकडील एका कर्मचाऱ्यावर बडतर्फची कारवाई करण्यात आली आहे.