रेड ब्लफ (अमेरिका) – कॅलिफोर्नियातील उत्तरेकडील एका वितरण केंद्रामध्ये झालेल्या गोळीबारात आज दोघेजण ठार झाले. या वितरण केंद्रातील एक कर्मचारी या गोळीबारात ठार झाला आणि अन्य चौघेजण जखमी झाले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये हा हल्लेखोरदेखील ठार झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कॅलिफोर्नियाच्या सॅक्रॅमेन्टोच्या उत्तरेस सुमारे 210 किलोमीटर अंतरावरील सुमारे 14 हजार लोकवस्ती असलेल्या रेड ब्लफ शहरात ही घटना घडली. या शहरातील वॉलमार्ट वितरण केंद्रात एका 31 वर्षीय व्यक्तीने दुपारी साडे तीन वाजता सेमी ऍटोमॅटिक रायफलने स्वैर गोळीबार करायला सुरुवात केली.
या हल्लेखोराने वॉलमार्टच्या पार्किंगला चार चकरा मारल्या. त्यानंतर या वाहनतळातील वाहनांना धडका देऊन वाहनांचे नुकसान केले. त्यानंतर तो रायफल घेऊन गोळीबार करायला लागला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो ठार झाला, असे रेड ब्लफ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
या गोळीबारात वॉलमार्टचा एक कर्मचारी ठार झाला. तर जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या वितरण केंद्राच्या आत असलेल्या 200 कामगारांपैकी काहींनी स्वतःला एका खोलीत बंदिस्त करून घेतले होते. या हल्लेखोराची ओळख अद्याप पटू शकलेली नाही. पण तो पूर्वी रेड ब्लफशी संबंधित होता, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्याने हा हल्ला का केला हे समजू शकलेले नाही.