नवी दिल्ली – कसोटी क्रिकेटमध्ये राहुल द्रविडने जी कामगिरी केली त्यापासूनच प्रेरणा घेतल्याचे चेतेश्वर पुजारा याने सांगितले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये संयम, शॉट सिलेक्शन व छोट्या खेळीचे रूपांतर मोठ्या खेळीत कसे करायचे याचे धडे द्रविडने दिल्यामुळे कारकीर्द यशस्वी होत असल्याचेही पुजारा म्हणाला.
भारतीय संघात निवड झाली तेव्हा माझा कसोटीतील खेळ पाहून अनेक समीक्षकांनी मला द्रविडची दुसरी आवृत्ती किंवा द्रविडचा वारसदार असे संबोधले. खरेतर द्रविडला पर्याय मिळणारच नाही पण मी त्याच्या पावलावर पाऊल टाकून प्रवास करण्याचा प्रयत्न करत आहे. मला माझी क्षमता पूर्णपणे माहीत आहे त्यामुळे मी द्रविडची नक्कल करत नाही तर त्याच्यासारखाच खेळ करत संघाच्या यशात वाटेकरी होण्याचा प्रयत्न करतो. द्रविडचे तंत्र, संयम, शॉट सिलेक्शन, प्रतिस्पर्धी गोलंदाजाला सामोरे जातानाची कणखर मानसिकता अविश्वसनीय आहे. त्याचा आदर्श घेत मी फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो, असेही पुजाराने सांगितले.
सध्या करोनाचा धोका कायम असल्याने क्रिकेटला पुन्हा कधी सुरुवात होईल ते सांगता येत नाही. या काळात मन कसे शांत ठेवायचे, विचार सकारात्मक कसे ठेवायचे याबाबत द्रविडने केलेले मार्गदर्शन खूपच मोलाचे ठरले. त्याची फलंदाजी पाहातच मोठा झालो. सराव करताना तसेच सामन्यात फलंदाजी करताना त्याचेच अनुकरण करण्याचा माझा हट्ट असायचा. मात्र, द्रविड ज्या पद्धतीने आपली खेळी साकारतो ते अविश्वसनीय आहे. त्याच्याकडूनच संघाची स्थिती कशी मजबूत करायची याचेही धडे मिळाल्याने माझ्या खेळात सुधारणा तर झालीच पण प्रगल्भताही आली, असेही त्याने सांगितले.
पदार्पण केल्यावर जेव्हा मी संथ फलंदाजी करत होतो तेव्हा क्रिकेटच्या जाणकारांनी मला द्रविडची दुसरी आवृत्ती असे संबोधले होते. खरे सांगायचे तर माझ्यावर त्यामुळे खूप दडपण आले होते. जर द्रविडच्या फलंदाजीचीच शैली माझ्या फलंदाजीत त्यांना दिसत असेल तर तो माझा सर्वात मोठा सन्मान आहे. एका खेळाडूचा खेळ पाहिल्यावर एका महान खेळाडूची आठवण येत असेल तर तो मान कोणत्याही पुरस्कारापेक्षाही मोठा ठरतो. अद्याप खूप काही करायचे आहे. संघाच्या विजयात सातत्याने सरस कामगिरी करायचा माझा प्रयत्न असतो. काहीवेळा अपयशही येते मात्र, त्यावेळी मानसिक कणखरता कामी येते, असेही पुजारा म्हणाला.
गोलंदाजांना हतबल करण्याचे तंत्र
राहुल द्रविडच्या फलंदाजीचे एक वैशिष्ट्य आहे की एखादा गोलंदाज भरात असेल तर त्याचा स्पेल संपण्याची तो वाट पाहतो. कसोटीत एखादा असा गोलंदाज जास्तीत जास्त 8 षटके टाकतो. त्यावेळी द्रविड संयम ठेवतो. एकदा का त्याचा स्पेल संपला की अन्य गोलंदाजांच्या गोलंदाजीवर धावा करतो. यामुळे जागतिक स्तरावर नावाजलेले गोलंदाजही हतबल झाल्याचे मी पाहिले आहे. त्याचे हेच तंत्र अवगत करण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही पुजाराने सांगितले.