नळाचे पाणी खेचणाऱ्या 17 विद्युत मोटारी जप्त

पिंपरी  – शहराला पाण्याची समस्या भेडसावत असताना बेकायदेशीरपणे नळाला मोटार लावून पाणी खेचणाऱ्या 17 मोटारी पाणीपुरवठा विभागाने जप्त केल्या. पाणीपुरवठा विभागाने काळेवाडी, पवनानगर परिसरात सोमवारी (दि.3) ही कारवाई केली. मात्र, केवळ पाणीटंचाई जाणवत असताना ही कारवाई करण्याऐवजी यामध्ये सातत्य ठेवण्याची मागणी करत, पाणीपुरवठा विभागाला उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची टिका नागरिकांनी केली आहे.

कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या काळेवाडी भागातील नागरिकांच्या तक्रारी पाणीपुरवठा विभागाला प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता भाऊसाहेब साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अभियंता जयवंत रोकडे व मीटर निरिक्षकांनी काळेवाडी पवनानगर परिसरात पाणीपुरवठा होत असताना तपासणी केली. त्यामध्ये 17 नागरिकांच्या घरात पाण्याच्या नळाला बेकायदेशीरपणे विद्युत मोटार लावून पाणी उपसा करत असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे या कारवाईत एकूण 17 विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत.

शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने सर्व नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे, या हेतून पाणीपुरवठा विभागाने नियोजन केले आहे. मात्र, तरीदेखील पाणी पुरेशा दाबाने होत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. बेकायदेशीर कृत्य काही नागरिकांकडून होत असल्याची बाब अनेकदा निदर्शनास आली आहे. अशाप्रकारची कारवाई केल्यानंतर, अनेकदा राजकीय दबाव आणून जप्त केलेल्या विद्युत मोटारी पुन्हा परत कराव्या लागल्या असल्याची बाब पाणीपुरवठा विभागातील एका अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.

जमिनीखाली टाकी बांधण्याचे आवाहन

अनेक नागरिकांनी घर बांधताना जमीनीखाली पाणीसाठा करणारी टाकी बांधलेली नाही. त्यामुळे घर अथवा इमारतीवरील टाकीमध्ये पाणी नेण्यासाठी विद्युत मोटारीचा वापर करतात. परिणामी, या भागांत अन्य ठिकाणी अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होतो. ही बाब टाळण्यासाठी घराजवळ जमीनीखाली टाकी बांधून त्यामध्ये पाणीसाठा करुन तो वापरावा. नळजोडांना विद्युत मोटार लावल्याचे आढळल्यास ती मोटार कायमस्वरुपी जप्त करण्याचा इशारा पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.